नोकरीवरून काढून टाकल्याच्या तणावात घरी परतताना अंगणवाडी सेविकेचा लोकलमध्ये मृत्यू

Spread the love

नोकरीवरून काढून टाकल्याच्या तणावात घरी परतताना अंगणवाडी सेविकेचा लोकलमध्ये मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – नोकरीवरून काढून टाकल्याच्या तणावात बेलापूरच्या कोकण भवनमधून परत येत असताना, लोकलमध्येच कोपर ते डोंबिवलीदरम्यान मुरबाडच्या अंगणवाडी सेविकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या मुलाने केली आहे. जयश्री कडाली असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. त्या मुरबाडमधील चैत्यपाडा अंगणवाडीत सेविका होत्या. ३० जुलै रोजी त्यांना सेवासमाप्तीची नोटीस देत, त्यांचे काम थांबवण्यात आले. मात्र, आपल्याला अचानक कामावरून का काढले?, याचे कारण विचारूनही ते न देता, नोटीस स्वीकारल्याबद्दल सही करण्यासाठी त्यांना बेलापूरमधील कोकण भवन कार्यालयात बोलावण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून जबरदस्तीने सही घेण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. कोणतेही कारण देण्यात आले नसल्याने आपल्याला काम करू देण्याची मागणी जयश्री यांनी केली होती. यानंतर त्यांना वरिष्ठाकडून ऑर्डर घेऊन येण्यास सांगण्यात आले. मात्र, कोकण भवनमध्ये त्यांना नंतर या, आम्ही पत्राने कळवू यांसारखी कारणे देत, परत पाठवण्यात आले. घरी परत जात असताना त्या प्रचंड तणावाखाली होत्या. अचानक नोकरी गेल्याने हतबल झालेल्या जयश्री यांची मुलाच्या मदतीने धडपड सुरू होती.

बुधवारी २८ ऑगस्टला त्या सकाळीच कोकण भवनला गेल्या. मात्र, दुपारपर्यंत त्यांना थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्यांना पत्राने उत्तर देतो, असे सांगत परत पाठवण्यात आले. जयश्री आपल्या मुलाबरोबर ठाणे ते बदलापूर लोकल प्रवास करत असताना, खूपच तणावाखाली होत्या. अशातच कोपर ते डोंबिवलीदरम्यान त्यांचे लोकलमध्येच निधन झाले. रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयश्री यांच्या मुलाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon