भीमाशंकरला जाताना काळाची झडप! कल्याणमधील शिवसेना नेत्याचा भाचा व मामेभाऊ ठार
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – श्रावण सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारवर काळाने रस्त्यातच झडप घातली. माळशेज घाट पार करत असताना कार झाडावर जाऊन आदळली, यात कल्याणमधील तीन तरुण जागीच ठार झाले. तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यु झालेले तिघांपैकी दोघे शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक आहेत. यात गायकवाड यांचा एक सख्खा भाचा, तर एक मामेभाऊ आहे. माळशेज घाटातील भोरांडे गावाच्या हद्दीतून जाताना भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. आश्विन भोईर (३१), नरेश मधुकर म्हात्रे (३३) आणि प्रतीक चोरगे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत तर वैभव मधुकर म्हात्रे (२५), शिवाजी पुडंलिक घाडगे ऊर्फ बंटी, अक्षय घाडगे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे सहा तरुण पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्तीने दर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे जात होते. वैभव मधुकर म्हात्रे यांच्या कारने रविवारी रात्री ते निघाले होते. भरधाव कार माळशेज घाटातील भोरांडे गावाच्या हद्दीतून जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर ती आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भाग चक्काचुर होऊन सहा जणांपैकी दोघे जागीच ठार झाले, तर प्रतीक चोरगे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार मधील वैभव मधुकर म्हात्रे, शिवाजी पुडंलिक घाडगे उर्फ बंटी आणि अक्षय घाडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना सुरूवातीला मुरबाडमधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीचिंताजनक असल्याने तिघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातात कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात राहणारे आश्विन भोईर, नरेश मधुकर म्हात्रे हे दोघे मृत्यूमुखी पडले. कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा अश्विन हा सख्खा भाचा, तर नरेश मामे भाऊ आहे.