नेपाळच्या १२ वर्षीय मुलीवर बदलापुरात अत्याचार; गर्भवती राहिल्याने क्रूर कृत्य समोर, नराधमाचा शोध
योगेश पांडे / वार्ताहर
बदलापूर – गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नवी मुंबईतील उरणमधील हत्याकांडामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, विनयभंग, बलात्काराच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. आता, बदलापूरमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १२ वर्षीय पीडित अल्पवीयन मुलीवर घरात घुसुन बळजबरीने एका अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचाराच्या घटनेमुळं पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात नरधमावर अत्याचारासह विविध कालमानुसार गुन्हा दखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, पोलिसांकडून अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार १२ वर्षीय पीडित अल्पवीयन मुलगी मूळची नेपाळ देशात राहणारी असून रोजीरोटीच्या शोधात ती कुटूंबासह भारतात आली आहे. पीडितेच कुटूंब कामाच्या शोधात असताना त्यांना बदलापूर पूर्व भागातील नव्याने सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम साईटवर काम आणि राहण्यास निवारा म्हणून एक खोली देण्यात आली. त्यातच २०२४ च्या जून महिन्यात पीडित मुलगी सायंकाळच्या सुमारास खोलीत एकटीच असल्याचा फायदा घेऊन अज्ञात नराधमाने तिच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर, तिच्यावर अत्याचार करुन तिला धमकी देऊन पळून गेला. अत्याचारी नराधमाच्या धमकीला घाबरून पीडित अल्पवीयन मुलगी भयभीत झाल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने कोणाही सांगितला नव्हता.
दरम्यान, पीडित अल्पवीयन मुलीच्या पोटात त्रास होत असल्याने तिला उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात १९ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या २९ वर्षीय आईच्या तक्रारीवरून २० जुलै रोजी भादंवि कलम ३७६, (अ ,ब ) सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी फरार नरधामाचा शोध सुरू केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले. खळबळजळ बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन १० दिवस उलटून गेले आहेत, तरीही अज्ञात नराधमाचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित होत आहे.