घरफोडी करुन दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी २४ तासात आवळल्या मुसक्या ; आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत
योगेश पांडे / वार्ताहर
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात २५ जुलैला चोरीची घटना घडली होती. चोरटा घराच्या पाठीमागे असणाऱ्या किचन रुमच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडून आतमध्ये शिरला होता. त्याने घरातील तब्बल ९ लाख ६५ हजार किंमतीचे दागिने चोरले होते. या चोराच्या मुसक्या आवळण्यात कोपरगाव शहर पोलिसांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईवर कौतुक केलं जात आहे. संबंधित घटना ही कोपरगाव शहरातील गजानन नगर भागात कोर्ट रोड परिसरात घडली होती. कोपरगावच्या कोर्ट रोड येथे मालती रुपेश हाडा या वास्तव्यास आहेत. यांच्याच घरात ही जबरी चोरीची घटना घडली होती. अज्ञात आरोपी हा २५ जुलैच्या मध्यरात्री घराच्या पाठीमागून किचन रुममधून घरात शिरला होता. आरोपीने किचन रुमच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला होता. त्याने किचन रुममध्ये नासधूस केली होती.
आरोपी चोराने किचन ओट्याखाली असलेल्या लोखंडी पेटीतील साडे नऊ लाख रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेले होते. संबंधित चोरीची घटना लक्षात आल्यानंतर घरमालकीण मालती रुपेश हाडा यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मालती हाडा यांनी पोलिसात तक्रार केली होती. यानंतर याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजून घेत तपासाला सुरुवात केली. तसेच पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याचादेखील शोध घेतला. पोलिसांकडून तपास सुरु असतानाच त्यांना गोपनीय माहीतीच्या आधारे त्यांना एका इसमावर संशय आला. पोलिसांनी तातडीने त्या इसमाला ताब्यात घेतलं. या इसमाचं नाव शुभम केशव राखपसरे असं आहे. तो इसमदेखील गजानन नगर परिसरातच राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने आपला गुन्हा कबूल करण्यास विरोध केला. पण पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीने दडवलेला मुद्देमाल हस्तगत केला.