यशश्री शिंदे या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या दाऊदला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतून दोन दिवसांपूर्वी हादरवणारी घटना समोर आली आहे. यशश्री शिंदे या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यशश्री गुरुवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला. यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर यशश्रीच्या कुटुंबीयांनी एकच अक्रोश केला आहे. आम्हाला न्याय द्या, त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबानं केली. यशश्रीच्या मारेकऱ्याला लवकर फाशीची शिक्षा द्यावी, ज्यामुळे इतर गुन्हेगारांच्या मनात देखील धाक निर्माण होईल, पुन्हा अशा घटना घडणार नाहीत. असं यशश्रीच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. दरम्यान दाऊद शेख हा गेल्या अनेक वर्षांपासून नाहक आमच्या मुलीला त्रास देत होता. त्याच्याविरोधात २०१९ ला पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यावेळी त्याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यानं पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानं केलेलं कृत्य खूप वाईट असून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांची कसुन चौकशी केला असता दाऊदची लोकेशन गाठली आणि ४ टीम बंगळूरूला रवाना केल्या. आरोपीचा लोकेशन ट्रेस करत पोलीसांनी आरोपी दाऊदला महाराष्ट्र – कर्नाटक बॉर्डर येथून अटक केली आहे.