घरफोडी करून लाखो ऐवज लंपास करणारे तीन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
छ. संभाजीनगर – सिडको एन वन येथे घरफोडी करून लाखो ऐवज लंपास करणाऱ्या तीन आरोपीच्या मुसक्या गुन्हे शाखेने ७२ तासाच्या आता आवळल्या. या आरोपींकडून सोने हिरे रत्नजडीत दागिने, चांदीचे दागिण्यासह गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६५ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीपैकी एकाने बीई मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतलेले असून त्यासह अन्य एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली. तर कारवाई करणाऱ्या पोलिस पथकास एक लाख रुपयांचे बक्षीस पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जाहीर केले. दरम्यान, रोहन संजय भोळे (३६), ऋषीकेश मधुकर काळे (२८) व आकाश दिनेश कोठे (२७ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी निखिल मुथा – ४१ यांचा सर्जिकल साहित्याचा व्यापार आहे. १३ जुलै रोजी रात्री आठ वाजता मॉलमध्ये खरेदीसाठी ते कुटुंबीयांसह गेले होते. घराला कुलुप असल्याची संधी साधत चोरट्याने घरफोडी करत सोन्याचे, हिऱ्याचे, चांदीचे तसेच मोत्याचे दागिने, मोबाइल तसेच रोख रक्क असे एकूण ८७ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी रात्री साडेनऊ वाजता घरी आल्यावर घरफोडी झाल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी सिडको पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असतानाच नाशिक येथील रोहन संजय भोळे याने साथीदारासह ही घरफोडीचा गुन्हा केला असून त्याचा एक साथीदार ऋषीकेश काळे हा रांजणगाव येथे आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गुरमे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्याआधारे पोलिस पथकाने धाव घेत दत्तनगर फाटा, रांजणगाव परिसरातून ऋषीकेश काळेला पकडले. गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याची विचारपुस केल्यावर त्याने साथीदार आकाश कोठे व रोहन भोळे याच्या मदतीने चोरी केली असून ते दोघेही साजापूर चौक, धुळे-सोलापूर महामार्ग येथे कारमध्ये थांबल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी साजापूर चौकात धाव घेत त्याचे साथीदार रोहन व आकाश या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. आरोपींकडून ६० लाख ९२ हजार ८२० रुपये किंमतीचे सोने, हिरे, रत्नजडीत तसेच चांदीच्या दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६५ लाख ९२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपींनी हा किंमती ऐवज कारमध्येच ठेवला होता. तीनही आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंके, पोलिस कर्मचारी प्रकाश गायकवाड, बाळु लहरे, नवनाथ खांडेकर, अमोल शिंदे, सुनील बेलकर, शाम आढे, तातेराव शिनगारे व पथकाने ही कारवाई केली.
संजय भोळे व ऋषीकेश काळे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्वामी यांनी दिली. दोघेही एकाच गल्लीत राहणारे असून रोहन यावर नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड, उपनगरसह सिन्नर, गंगापूर, ओझर आदी पोलिस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. ऋषीकेशवर चार गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.