शाळेतून काढण्याच्या धमकीने विद्यार्थी बिथरला, घरी जाऊन केली आत्महत्या; शाळेच्या संचालकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणच्या ग्रामीण भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळा प्रशासनाने चार विद्यार्थ्यांना तुमचा शाळेचा दाखला घरी पाठवतो, अशी ताकीद देत चौघांना घरी पाठवून दिले. त्यातील एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आणि घरामध्येच गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहे.आता या प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. कल्याण तालुक्यातल्या निंबवली गावात राहणारा विद्यार्थी हा कल्याण जवळच्या कांबा परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता अकरावीत शिकत होता. बुधवारी सकाळी त्या विद्याथ्याला शाळेने घरी पाठविले आणि तो जसा घरी आला तशी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आल्यानंतर पालकांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी अनिशच्या घरी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मीणीबाई रुग्णालयात पाठवून दिला.
दरम्यान, या प्रकरणी कल्याण तालुका पोलिस एडीआर दाखल केला असून पोलिसांनी आता या प्रकरणात शाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.शुक्रवारी दुपारी यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले.मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.