पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये राडा; बराकीत बसलेल्या कैद्याला मारहाण
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सध्या पुणे शहर कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये राडा झाला आहे. प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयावरून कैदयाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना येरवडा कारागृहातील सीजे विभागातील बॅरेक क्रमांक एकच्या परिसरात १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती
याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरिष भोसले, आकाश मंगेश सासवडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन कैद्यांची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कैदी योगेश जगदीश सोनवणे बराकीत बसला होता. त्यावेळी आरोपी काळे, भोसले, सासवडे या तिघांनी सोनवणे या कैदयाला बराकीच्या बाहेर बोलावून घेतले. दरम्यान, प्रतिस्पर्धी गटाला माहिती देतो असे सांगून आरोपींनी सोनवणेला लाथबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर बंदोबस्तावरील सुरक्षारक्षकांनी काळे, भोसले, सासवडे या तिघांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे अधिक तपास करीत आहेत.