भिवंडीतील पावरलूम कारखान्यात बेकायदेशीर औषधे व इंजेक्शन तयार करणारे गजाआड
ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात एकूण १४ लाख ६४ हजार रुपयांचा कच्चा माल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडीच्या खाडीपार येथील घरत कंपाऊंड, तळवली नाका येथील पावरलूम कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर औषधे आणि इंजेक्शन तयार करण्यासाठी साठवलेला कच्चा माल जप्त करण्यात एफडीए विभागाला यश आले आहे. या कारखान्यात बनावट औषधे व इंजेक्शन पॅक करून बाजारात विकले जात होते. ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक राजश्री दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून निजामपुरा पोलिसांनी बापगाव कल्याण येथील सोहेल मोहतसीम बर्डी व आलम मोहम्मद बर्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या खाडीपारकडे असलेल्या तळवली नाका, घरत कंपाऊंडजवळील हुसेन खान यांच्या पावरलूम कारखान्यात औषधे आणि इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवली जात असल्याची गुप्त माहिती ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या पॅकिंगसाठी दोन्ही आरोपींनी कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवळी जात होते.औषध निरीक्षक राजश्री दीपक शिंदे यांनी त्यांच्या पथकासह या पावरलूम कारखान्यावर छापा टाकून एकूण १४ लाख ६४ हजार ८०० रुपये किमतीची औषधे व इंजेक्शन बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल व पॅकिंग साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींनी हा माल कोठून आणला आणि पॅकिंग करून ते कोठे विकत होते, याचा तपास निजामपुरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज केदार करीत आहेत.