पुण्यात सायबर चोरट्यांकडून महिला व जेष्ठ नागरिक टार्गेट; एकाच दिवशी ६ जणांची फसवणूक, विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Spread the love

पुण्यात सायबर चोरट्यांकडून महिला व जेष्ठ नागरिक टार्गेट; एकाच दिवशी ६ जणांची फसवणूक, विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – राज्यात ठिकठिकाणी ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट तसेच पोलीस असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांकडून नागरिकांना फसवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात आहे. रविवारी (दि.२) एकाच दिवसात सहा ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुक झाल्याची तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांची एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

बाणेर रोड येथे राहणाऱ्या एका ६८ वर्षीय महिलेला एसबीआय बँक क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर नवी क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवून अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने अँप डाऊनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेऊन बँक खात्यातून ५ लाख ५६ हजार ५०० रुपये काढून घेऊन आर्थिक फसवणूक केली. याप्रकणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने बाणेर भागातील एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच ५४ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ४१ लाख ७४ हजार ९९० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत महिलेने चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढवा येथील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून प्रदीप सांवत व राजेश मिश्रा बोलत असल्याचे सांगून मनी लाँड्रींग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवली तसेच केस क्लिअर करुन एनओसी सर्टीफिकेट देण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून १० लाख ७० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला मुंबई हायकोर्टात केस दाखल असून वॉरंट निघाल्याची भीती घातली. त्यांची बँक खाती तापसण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी महिलेला ९ लाख ७५ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारे जेष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन पुन्हा एकदा पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon