मुंबईतील फ्लॅटमधून येत होता घाणेरडा वास; दरवाजा तोडताच बेडरूममध्ये सपड़ले दोन मृतदेह
६१ वर्षीय प्रमोद चोणकर आणि ५७ वर्षीय अर्पिता चोणकर दांपत्याने केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत एका घरात दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एक ६१ वर्षीय व्यक्ती खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याची ५७ वर्षीय पत्नी त्याच्या शेजारी मृतावस्थेत पडली होती. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे संपूर्ण प्रकरण कांदिवलीच्या आर्य चाणक्यनगर येथील अनुभूती सोसायटीमधील आहे. रविवारी येथील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद दिसला. अनेक प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
आत शिरताच वास अधिकच तीव्र झाला. पोलिसांनी एक खोली उघडली असता त्यामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. समता नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांना प्रमोद वासुदेव चोणकर हे सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने लटकलेले दिसले आणि त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी अर्पिता प्रमोद चोणकर मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. मृतदेह कुजले होते, असं अधिकाऱ्याने सांगितलं. या जोडप्याला मूलबाळ नव्हतं. सध्या ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने पुढं सांगितलं की, घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे ज्यामध्ये मयत व्यक्तीने नमूद केलं आहे की ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत आणि स्वतःच्या इच्छेने हे पाऊल उचलत आहे. तसंच यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. १३ मे रोजी दोघांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे, कारण १६ मे रोजी शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांना याची माहिती मिळाली. तोपर्यंत मृतदेह कुजले होते. सध्या समता नगर पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.