सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; सहावा आरोपी हरियाणातून अटक
मुंबई पोलिसांकडून हरियाणातून हरपाल सिंगला अटक, मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केल्याचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी हरियाणातील फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली. हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ३७ वर्षांचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला मंगळवारी विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आला.
७ मे रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक केली होती. राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे आहे. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती. १४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या ७२ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्र पुरवणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ एप्रिल रोजी सोनू चंदर – ३७ आणि अनुज थापन – ३२ यांना अटक केली होती. सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्या फायर केल्यात आणि १७ राऊंड जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या आरोपींनी बिहारमध्ये गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.