मुंबईतील महिलेला २५ कोटींचा गंडा, ऑनलाइन फसवणुकीने खळबळ; आतापर्यंत सर्वात मोठी फसवणूक

Spread the love

मुंबईतील महिलेला २५ कोटींचा गंडा, ऑनलाइन फसवणुकीने खळबळ; आतापर्यंत सर्वात मोठी फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – राज्यात ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असून पोलिसांनीअनेकदा आवाहन करून देखील नागरिक जागृत होत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अशीच एक घटना नुकतीच घडली आहे आणि हा सर्वांत मोठा आतापर्यंतचा ऑनलाईन सायबर स्कॅम आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेची २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला सायबर चोरट्यांचा पहिला फोन आला, त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात सदर महिलेने भीतीच्या सावटाखाली या चोरट्यांना २५ कोटी रुपये पाठविले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी महिला बहुराष्ट्रीय कंपनीतून संचालक पदावरून निवृत्त झाली आहे. या महिलेला अनोळखी लोकांनी फोन करून त्यांचे नाव मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने स्वतःची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी स्वतःच्या आणि आईच्या नावावरील शेअर्स विकून पैशांची व्यवस्था केली.

दरम्यान सायबर चोरट्यांनी महिलेच्या नावानेच बँकेत करंट अकाउंट उघडले. त्या खात्यात महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने शेअर्स विकून आलेले पैसे तिच्याच नावाने असलेल्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी ते पैसे विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले. सायबर चोरट्यांनी महिलेला सांगितल्यानुसार, महिलेने पैसे जमा केल्यानंतर ते पैसे रिझर्व बँकेकडे जमा केले जाणार आहेत. ते पैसे महिलेला काही दिवसानंतर परत देखील मिळणार होते. मात्र तब्बल २५ कोटी रुपये पाठवल्यानंतर देखील आपले पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाशी संबंधित ३१ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक असल्याने पोलिसांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातले आहे.पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon