घराच्या पुनर्विकासाबाबत मतभेद, भावाने केली भावाची हत्या, आरोपी सराईत गुन्हेगार; मेघवाडी पोलिसांकडून अटक.

Spread the love

घराच्या पुनर्विकासाबाबत मतभेद, भावाने केली भावाची हत्या, आरोपी सराईत गुन्हेगार; मेघवाडी पोलिसांकडून अटक.

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – घराच्या पुनर्विकासाबाबत मतभेद असल्यामुळे एका भावाने दुसऱ्याची हत्या केल्याचा प्रकार जोगेश्वरी पूर्व येथे घडला. याप्रकरणी आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात यापूर्वी हत्येचा प्रयत्न, मारहाण असे गंभीर १६ गुन्हे दाखल आहेत. त्याला दारू पिण्याचेही व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुबोध राघोजी सावंत, (४८), असे मृत व्यक्तीचे नाव असून तो जोगेश्वरी पूर्व येथील गांधीनगर परिसरातील हडकर चाळीत वास्तव्याला होता. याप्रकरणी सुबोधचा मोठा भाऊ दीपक सावंत, (५२), याला मेघवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुबोध राहत असलेल्या हडकर चाळीचा पुनर्विकास होणार आहे. ते घर सुबोध यांची आईच्या नावावर होते. त्या ठिकाणी पुनर्विकासात पार्थ कॉ.हाऊसिंग सोसायटी उभी राहणार असून तेथे त्यांना नवे घर मिळणार होते. त्यासाठी विकासकाने सर्व रहिवाशांना घर रिकामे करण्यास सांगितले होते. सर्व रहिवाशांना इतर ठिकाणी राहण्यासाठी एकूण दोन लाख ३२ हजार रुपये भाडे स्वरूपात देण्यात आले होते. ती रक्कम थेट रहिवाशांच्या खात्यात जमा झाली. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपकला दारूचे व्यसन होते. तसेच दीपकचा पुनर्विकासाला विरोध होता. त्या वादातून मंगळवारी दीपकने घरातील एका टणक वस्तूने सुबोधच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात त्याच्या उजव्या भुवईवर गंभीर जखम झाली व तो खाली कोसळला.

सुबोधला तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर येथे नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी बहीण सुरेखा सावंत यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दीपकला अटक केली. दीपक विरोधात मारामारीचे ११ गुन्हे, तसेच हत्येच्या प्रयत्नाच्या एका गुन्ह्यासह एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. दीपक हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरोधात ८ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon