ठाण्यात शिंदें गटाचा उमेदवार ठरला, व्हायरल पत्राने फुटले नाव
प्रताप सरनाईक यांनी पोलिस आयुक्तांकडे कोणते गुन्हे दाखल असल्याची माहिती मागितल्यामुळे चर्चांना उधाण
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊण्ड असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपचाही डोळा होता. त्यामुळे जागावाटपात ठाणे कुणाला सुटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र शिंदेंवर स्वतःचं ‘घरचं मैदान’ गमावण्याची नामुष्की टळणार आहे. कारण ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक या जागेतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झाल्यामुळे त्यासंबंधी चर्चांना उधाण आलं आहे. आपण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे आपल्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याची माहिती द्यावी, असे पत्र प्रताप सरनाईक यांनी वसई-विरार, मीरा भाईंदर कार्यक्षेत्राच्या पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.
दरम्यान, ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सामना होणार आहे. राजन विचारे आपली जागा टिकवण्यात यशस्वी होतात की सरनाईकांना आमदारकी ते खासदारकी अशी बढती मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.