१० वर्षांच्या दोन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी २० वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक

१० वर्षांच्या दोन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी २० वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – इमारतीसमोर खेळणाऱ्या दोन १० वर्षांच्या मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या २० वर्षीय सुरक्षा रक्षकाला गुरुवारी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित मुली नागपाडा येथील एका इमारती शेजारील मोकळ्या जागेत खेळत होत्या. आरोपीने १७ ते २० मार्च या कालावधीत १० वर्षांच्या दोन मुलींची छेड काढली. मुलींनी सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण बुधवारी छेडछाडीनंतर त्यांनी हा प्रकार आईला सांगितला. त्यानुसार मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात तक्रार केली.

याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. मुलींचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला गुरुवारी नागपाडा येथून अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon