नवी मुंबईत शेत उत्पादनात गुंतवणूक करणाऱ्या ३०० जणांना २६ कोटींना चुना लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Spread the love

नवी मुंबईत शेत उत्पादनात गुंतवणूक करणाऱ्या ३०० जणांना २६ कोटींना चुना लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

उरण नंतर नवी मुंबईत चिटफंड घोटाळा

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – शेती उत्पादनात गुंतवणूक करून महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत मिळवा, अशी जाहिरात करून रुद्रा ट्रेडर्स कंपनीने एजंटद्वारे सुमारे ३०० लोकांची अंदाजे २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रार अर्जाची छाननी करून संबंधित आरोपींविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव, सचिन भिसे यांचा सहभाग असून, मुख्य आरोपी पार्टेसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. जाहिरातबाजी करून ग्राहकांना आकर्षित केले जायचे.संचालकांच्या फसव्या भूलथापांना बळी पडून शेकडो लोकांनी आपल्या आयुष्याची पुंजी जमा केली. गुंतवणूकदारांना विश्वास वाटावा म्हणून त्यांना धनादेश व बॉण्ड दिले जायचे. शेवटी पितळ उघडे पडलेच.

 

हा संपूर्ण व्यवहार पारदर्शक वाटावा हे दाखवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे धनादेश, फिक्स डिपॉजिट बॉण्ड गुंतवणूक दारांना दिले जात होते. हा सर्व प्रकार मार्च २०२२ पासून सुरु होता. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यात मुख्य आरोपी पार्टे हा बहुतांश वेळेस देशाबाहेर असतो. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री अनेकांना पटल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. याबाबत काही दिवसांपूर्वी महेंद्र डेरे या गुंतवणूकदाराने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पथक नेमले व त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक दामले, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक यांच्या सह पथकाने अगोदर सर्व प्रकरणाची शहानिशा केली. याबाबत आरोपींना गाफील ठेवण्यात आले आणि सर्व प्रकाराची खात्री पटल्यावर कारवाईसाठी सर्व कागदपत्रे जमा होताच गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नितीन पार्टे संचालक असलेली रुद्रा ट्रेडर्स नावाची फर्म आहे. वाशीतील सर्वात आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळख असलेल्या सतरा प्लाझा या ठिकाणी त्याचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याच बरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम ही फर्म करते असे सर्वांना सांगितले जात होते. या शिवाय पार्टे हा लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालकही आहे. या दोन्हीच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आम्ही थेट शेतात बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करतो, त्यामुळे नफा फार मोठा मिळतो. तुम्हीही गुंतवणूक करा. जेवढी गुंतवणूक त्याच्या पाच टक्के दर महिन्यात परतावा मिळणार तसेच गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांनी मिळणार असे आमिष दाखवून पैसे घेतले जात होते, मात्र त्यांचा गोरखधंदा जास्त काळ चालला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon