अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी स्वतःवर झाडली गोळी; जागीच मृत्यू
नाशिक – नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी २० फेब्रुवारी, रोजी सकाळी एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातील त्यांच्या केबिनमध्ये सरकारी रिव्हॉल्वरनं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
अशोक नजन हे वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी दिवसपाळीसाठी ते नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता पोलीस ठाण्यात आले. हजेरी लावल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले. त्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. स्वत:च्या पिस्तुलातून त्यांनी डोक्यात गोळी झाडली.
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर ते जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.त्यांच्या मृत्यूची पोलीस चौकशी सुरू आहे.