केडीएमसी कर्मचारी विनोद लंकेश्री हल्ला प्रकरणी रामनगर पोलिसांकडून चार जणांना अटक
कल्याण – केडीएमसी कर्मचारी विनोद लंकेश्री हल्ला प्रकरणी रामनगर पोलिसांनी हल्ला करणाऱ्यासह चार जणांना अटक केली आहे. हे चौघे मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे आहेत. कमरुद्दीन शेख, अरबाज सय्यद, इस्त्राईल शहा आणि शाहरुख शेख अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. हल्ला कशासाठी आणि काःणाच्या सांगण्यावरुन केला गेला आहे. याचा उलगडा अद्याप झालेला नाही. म्हणजे या हल्ल्यामागे कोणी तथा कथित बिल्डर, फेरीवाल्यांचा नेता की केडीएमसीतील कोणी शुक्राचार्य आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील शहीद भगतसिंग रस्त्यावर २७ तारखेच्या रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या वेळेस विनोद लंकेश्री या केडीएमसीच्या चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विनोद हा जखमी झाला. हल्लेखोर चाकूने हल्ला करुन पसार झाला होता. काही नागरीकांनी त्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्या हाती लागला नाही. रामनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी भादवी ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विनोद नावाचे केडीएमसीचे चालक आहेत. या गुन्हेगाराच्या नावावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणारा कोण असा प्रश्न आता निर्माण झाला होता.
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु करण्यात आला. पोलीस निरिक्षक आशा खापरे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी शहाजी नरडे, पोलीस अधिकारी योगेश सानप, पोलीस अधिकारी अजिंक्य धोंडे, पोलीस कर्मचारी विशाल वाघ, पोलीस कर्मचारी शिवाजी राठोड याांची तीन पथके तपासाकरीता रवाना झाली. अखेर पोलिसांना यश आले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.
कमरुद्दीन शेख हल्ला करणारा होता. बाकी तिघे कमरुद्दीनला हल्ला केल्यावर सुरक्षित पळवून नेण्याकरीता आजूबाजूला लपून थांबले होते. रामनगर पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला पकडले. परंतू या कमरुद्दीनला कोणी सुपारी दिली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. चौघे हल्लेखोर रिक्षा चालक आहेत. यांचा लंकेश्री सोबत काही संबंध नाही. आता पोलीस मुख्य सुत्रधाराला कधी शोधतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.