चिंचवड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर
पिंपरी-चिंचवड : मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. शहरात ठिकठिकाणी जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभारी अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून तीन महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग जातो. पुणे-बेंगलोर महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हे शहरातून जाणारे प्रमुख महामार्ग आहेत. राज्यात कुठेही आंदोलन झाले तरी त्याचे पडसाद महामार्गांवर उमटतात. त्यामुळे पोलिसांनी महामार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महामार्गावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांनी महामार्गांवर गस्त वाढवली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी ऑन फिल्ड उतरले आहेत. गहुंजे येथील स्टेडीयमवर न्यूझीलंड विरुद्ध साउथ आफ्रिका हा क्रिकेट सामना होणार आहे. दरम्यान, मराठा आंदोलक स्टेडीयमवरील खेळपट्टी उखड्ण्याची गोपनीय माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी स्टेडीयम परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. स्वतः पोलीस आयुक्तांनी स्टेडियमची पाहणी करून अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. बुधवारच्या सामन्यासाठी शहरात भलामोठा अधिकचा फौजफाटा मागवण्यात आला आहे. हा सर्व बंदोबस्त स्टेडीयम परिसरात लावण्यात आला आहे.
आंदोलक रस्त्यांवर टायर जाळतात. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर पडलेले तसेच गॅरेज समोर ठेवलेले टायर जप्त केले आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा देखील बंद केल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर आयुक्तालयाची मदार असल्याने पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.