आग्रीपाड्यातील उच्चभ्रू इमारतीत सुरू होती एमडी ड्रग्ज फॅक्टरी; अमली पदार्थ विरोधी पथकाची धाड, ५० कोटींचा मुद्देमाल जप्त

आग्रीपाड्यातील उच्चभ्रू इमारतीत सुरू होती एमडी ड्रग्ज फॅक्टरी; अमली पदार्थ विरोधी पथकाची धाड, ५० कोटींचा मुद्देमाल जप्त

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने आग्रीपाडा परिसरातील उच्चभ्रू इमारतीत सुरू असलेल्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज निर्मिती रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल ५०.७४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका बांग्लादेशी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा येथील ‘यास्मिन अपार्टमेंट’च्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी, कांदिवली युनिटला २५ मे रोजी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान फ्लॅटमध्ये सुरू असलेली ड्रग्ज लॅब उध्वस्त करण्यात आली.

या छाप्यात ८ किलो ३०५ ग्रॅम लिक्विड एमडी, ६ किलो १८८ ग्रॅम मेफेड्रॉन, ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी रसायने, कच्चा माल आणि विविध उपकरणे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५० कोटी ७४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी मोहम्मद शोएब शौकत अली मन्सुरी (३१), सूफियान सलीम मन्सुरी (२८) आणि रीना अख्तर मिस्ती (२२) या तिघांना अटक केली आहे. रीना ही बांग्लादेशातील सिलेट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमली पदार्थ विरोधी, कांदिवली युनिटकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक उल्हास खोलम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon