सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरातील सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे मंदिर परिसराला अधिक भव्य स्वरूप प्राप्त होणार असून भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच नगरसेवक भास्कर शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसराच्या विकासामुळे भाविकांना अधिक आकर्षक आणि सुसज्ज वातावरण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सायंकाळी पूजा-अर्चना आणि भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविकांनीही यावेळी उपस्थिती लावली.