महिनाभरापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट; सोलापुरात पतीकडून पत्नीवर ५० वार करत खून
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ भर रस्त्यात एका विवाहितेची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. धनश्री पाटील असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती ऋषिकेश पाटील यानेच हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे बार्शी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री आणि ऋषिकेश हे दोघेही एका खासगी बँकेत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास धनश्री या स्कुटीवरून बार्शी-परंडा रोडने जात असताना ऋषिकेशने त्यांना अडवले. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर संतप्त झालेल्या ऋषिकेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने धनश्रीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने तब्बल ५० हून अधिक वार केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धनश्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भर रस्त्यात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
या प्रकरणी आरोपी ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.