मुंबईत बेस्ट डेपोमध्ये अग्नितांडव; एकामागून एक दोन बसेस जळून खाक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील सायन येथील प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपोमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या दीड तासाच्या अंतराने एकामागून एक अशा दोन बेस्ट बसेसला अचानक आग लागल्याने डेपो परिसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत दोन्ही बसेसची आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा नगर डेपोमध्ये पहिली आग मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास लागली. या बसला आग लागल्याचे समजताच डेपोतील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान पहिल्या बसची आग विझवत असतानाच, साधारण तास-दीड तासाच्या अंतराने डेपोत उभ्या असलेल्या दुसऱ्या बसनेही अचानक पेट घेतला.एकाच रात्री लागोपाठ दोन बसेसला आग लागल्यामुळे डेपो प्रशासनात आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही आगींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
या दोन्ही बसेस रोजच्या वापरातल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली बस ही कुलाबा येथून आपली प्रवासी फेरी पूर्ण करून प्रतीक्षा नगर डेपोमध्ये परतली होती आणि तिथे पार्क केलेली होती. तर दुसरी बस ही आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राखीव ठेवण्यात आली होती.या दोन्ही बसेसला अचानक आग कशी लागली, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली की यामागे इतर काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास बेस्ट प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे. सुदैवाने या आगीच्या वेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच डेपोतील सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.