नवी मुंबईत १० टक्के पाणीपुरवठ्याची कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नवी मुंबईत १० टक्के पाणीपुरवठ्याची कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी- निझामपूर आणि आता नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातही आता पाणी कपात करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून म्हणजेच २५ मे पासून अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जाणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोरबे धरणातील जलसाठा चिंताजनक पातळीवर घसरल्यामुळे महानगर पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन तसेच ‘अल- निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र सध्या धरणात केवळ ३६.४७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच अवघा १९.११ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्यासाठी ही कपात लागू करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने निर्णयानुसार शहरातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ही कपात नवी मुंबईसोबतच मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या सिडकोच्या खारघर आणि कामोठे या नोड्सनाही लागू राहणार आहे. या भागांमध्ये दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जोपर्यंत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नाही आणि पाणीसाठ्यात वाढ होत नाही, तोपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon