परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार; मॉर्निंग वॉकला गेलेल्या ५० वर्षीय व्यक्तीची हत्या

परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार; मॉर्निंग वॉकला गेलेल्या ५० वर्षीय व्यक्तीची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर

परभणी – परभणीच्या पूर्णा शहरातील ‘गुड मॉर्निंग रोड’ परिसरात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. नियमितप्रमाणे मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय इसमाला अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पोटात वार करून संपवले. या घटनेमुळे पूर्णा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

देवराव बैजाजी साखरे (५०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. देवराव साखरे हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम आणि मॉर्निंग वॉकसाठी गुड मॉर्निंग रोड परिसरात गेले होते. याच दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, साखरे यांच्या पोटात गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास तिथून जाणाऱ्या इतर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना देवराव साखरे हे गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पूर्णा पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या देवराव साखरे यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तपासाअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील, पीएसआय प्रकाश इंगोले, पोलीस कर्मचारी माधव अक्कलवाड आणि अजय माळकर यांच्यासह पोलिसांचे मोठे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी ‘फॉरेन्सिक एक्सपर्ट’ (न्यायवैद्यक शास्त्र) टीमलाही पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे संकलित केले आहेत.

ही घटना जुन्या वादातून घडली की यामागे काही कौटुंबिक किंवा आर्थिक कारण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे विविध अंगांनी तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon