नीट पेपरफुटी प्रकरणात तिसऱ्या महिला आरोपीला अटक; पुण्यातून तिसरी ‘मनीषा’ जेरबंद, चक्रावणारा खेळ समोर
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आणखी मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी आणखी एका प्राध्यापिकेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. मनीषा हवलदार असं या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पुण्यातून मनीषा नावाने अटक होणारी ही तिसरी महिला आहे. मनीषा हवलदार या फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत, अशी माहिती आहे. एनटीएकडे असणाऱ्या फिजिक्सच्या प्रश्नांना मनीषा हवालदार हिला अक्सेस होता. तसेच यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेला मिळून मनीषा हवालदारने फिजिक्सचे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे. ते लीक केलेले सर्व प्रश्न तपासण्यात आले. यावेळी लीक झालेले प्रश्न हे नीटच्या प्रश्न पत्रिकेसोबत तंतोतंत जुळल्याचं तपासात समोर आलं आहे.
नीट परीक्षेचा पेपर ठरणाऱ्या एनटीए मध्ये एक्सपर्ट म्हणून मनीषा हवलदार हिचा समावेश होता. पेपर सेट करण्यासाठी विषयाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती. मनीषा हवलदार पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती. फिजिक्स विषयात तज्ज्ञ असणारी मनीषा हवलदार बायोलॉजीची तज्ज्ञ प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्या संपर्कात होती. मनीषा मांढरे ही बायोलॉजीची प्राध्यापिका होती. सीबीआयने तिलादेखील अटक केली आहे. त्याआधी ती जिच्यासोबत मिळून पेपर फोडायची त्या ब्युटी पार्लरवाली मनीषा वाघमारे हिलादेखील अटक करण्यात आली आहे. मनीषा हवलदार आणि मनीषा मांढरे या एकमेकांच्या संपर्कात होत्या आणि तिने नीट परीक्षेचे प्रश्न मांढरे हिच्यासोबत शेअर केले होते, अशी माहिती तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिसऱ्या मनीषाला सीबीआयने अटक केली आहे.
सीबीआयने मनीषाला थेट पुण्यातून ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, याचाही तपास सुरू आहे.
आतापर्यंत या प्रकरणी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर दिल्ली, जयपूर, गुरुग्राम अशा विविध शहरांमधून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याआधी दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यात फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिला अटक करण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी ही अकरावी अटक आहे. यामधील सात आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत आणि चार आरोपी हे बाहेरच्या राज्यातील आहेत.