उल्हासनगरात भरदिवसा गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा संशय

उल्हासनगरात भरदिवसा गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा संशय

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : उल्हासनगरातील कैलास कॉलनी चौक परिसर गुरुवारी सायंकाळी भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबाराने हादरला. जुन्या वैमनस्यातून १० ते १२ जणांच्या टोळीने दुचाकींवर येत अंदाधुंद गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून अर्जुन चव्हाण गंभीर जखमी झाला आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राचीन शिवमंदिर रोडलगत असलेल्या कैलास कॉलनी चौकातील के.सी. ग्रुप कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या टोळीने सात राउंड फायर केल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या हल्ल्यात अमोल चव्हाण, अनिल चव्हाण आणि अर्जुन चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना अमोल आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला. अर्जुन चव्हाण याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे उल्हासनगर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon