पुण्यात प्रतिबंधित वन्यजीव विक्रीप्रकरणी दोघे अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक युनिटने प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. पुणे रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या या कारवाईत तीन जिवंत शेकरू आणि सात ‘इंडियन स्टार टॉर्टॉईज’ जप्त करण्यात आले.
डीआरआय अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे २० मे रोजी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये लपवून ठेवलेल्या तीन जिवंत शेकरू आढळल्या. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून आणखी एका संशयिताकडून सात जिवंत इंडियन स्टार टॉर्टॉईज जप्त करण्यात आल्या.
दोन्ही प्रजातींचा समावेश ‘वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२’च्या अनुसूची-१ मध्ये असून त्यांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांची शिकार, वाहतूक, ताबा आणि व्यापार यांवर बंदी आहे.
जप्त वन्यजीव आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.