ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई; महिला दलाल अटकेत, तिघींची सुटका
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ठाणे पश्चिम येथील गोखले रोड परिसरात कारवाई करत वेश्या व्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणाऱ्या एका महिला दलालाला अटक केली. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “शिवसागर वेज रेस्टॉरंट” परिसरात काही महिलांना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी बोलावले जात असल्याची माहिती गुप्त माहितीदारामार्फत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून संबंधित महिला दलालाला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३ (१), १४३ (३) तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या तिन्ही पीडित महिलांना संरक्षणासाठी उल्हासनगर येथील शांतीसदनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.