ठाण्यातील नौपाडा परिसरात असलेल्या भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर अनेक दुकाने जळून खाक
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील नौपाडा परिसरात असलेल्या गावदेवी भाजी मार्केट येथे गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटे सुमारे ३:४३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच काळानंतर आग आटोक्यात आली, मात्र या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत.
गुरुवारी पहाटे आग लागल्याचे कळल्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, नौपाडा पोलीस, महावितरण कर्मचारी तसेच विविध यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.आग विझविण्यासाठी ५ फायर इंजिन, ३ जम्बो वॉटर टँकर, २ वॉटर टँकर, ४ रेस्क्यू वाहने, रुग्णवाहिका तसेच खासगी पाण्याचे टँकर यांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.आगीच्या या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सुजित पष्टे (४५) आणि तांडेल समीर जाधव (४०) यांचा समावेश आहे. दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या आगीत ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू शंकर गाडेकर (५३) आणि अग्निशमन केंद्रातील स्थानक अधिकारी सागर शिंदे (४३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले तसेच परिसरात मोठी खबरदारी घेण्यात आली.घटनास्थळी नगरसेवक संजय वाघुळे, नौपाडा रक्षक प्रमुख किरण नाकती, अतिरिक्त आयुक्त रोडे, उपआयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त दिनेश तायडे, उपआयुक्त मिताली मॅडम, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.