नीट पेपरफुटी तपासाचे धागेदोरे बीडपर्यंत; अंबाजोगाईतील शिक्षिका व दोन विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी

नीट पेपरफुटी तपासाचे धागेदोरे बीडपर्यंत; अंबाजोगाईतील शिक्षिका व दोन विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता बीड आणि लातूर कनेक्शन अधिक गडद होत असल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाने तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

चौकशीतील दोन्ही विद्यार्थी हे बहीण-भाऊ असून ते लातूरमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थीनी असून ती पुन्हा नीट परीक्षेला बसली होती, तर भाऊ प्रथमच परीक्षेला सामोरा गेला होता. संबंधित पेपर या दोघांसाठीच मिळवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे चौकशीची दिशा अधिक गंभीर बनली आहे.

सीबीआय कडून विद्यार्थ्यांच्या शिक्षिका असलेल्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती वाढल्याचे मानले जात आहे. चौकशीनंतर अंबाजोगाई परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणातून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, नीट घोटाळ्याचा कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याचे बीड कनेक्शन समोर आल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेच्या एका निवेदनाच्या लेटरहेडवर शिवराज मोटेगावकर यांचा ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून उल्लेख आढळल्याची माहिती समोर आली आहे. हे निवेदन २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

यामुळे मोटेगावकर यांच्याशी संबंधित कोचिंग क्लास चालक आणि शैक्षणिक नेटवर्कही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीड शहरातील शाहूनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत असून, हा भाग शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखला जातो.

तपासाच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसही चर्चेत आले आहेत. संस्थेचे प्रमुख संचालक म्हणून ओळखले जाणारे शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआय च्या ताब्यात असताना, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेकडून सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.

NEET परीक्षा पुन्हा होण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने RCC च्या नियोजन समितीने ही पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅम्पसमध्ये दाखल होत असून, परीक्षा पद्धतीनुसार त्यांची तयारी करून घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon