पोखरण रोडवरील अनधिकृत लॉजचे ‘रातोरात’ बांधकाम?; वर्तकनगर प्रभाग प्रशासनावर संगनमताचे आरोप
सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी यांच्या आशीर्वादाने लॉज चे निर्माण कार्य जोरात
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिका प्रशासन चर्चेत आले आहे. पोखरण रोड क्रमांक १ परिसरातील गोल्डन नटराज बारच्या शेजारी, उपवन परिसरात सुमारे दोन हजार स्क्वेअर फुट जागेवर उभारण्यात येत असलेल्या कथित अनधिकृत लॉजच्या बांधकामामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम वर्तकनगर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादाने’ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित जागेवर काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, लोखंडी संरचना आणि सिमेंट काँक्रीटचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत काम सुरू राहत असल्याने परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, अग्निसुरक्षा विभागाची ना हरकत आहे का, तसेच लॉज सुरू करण्यासाठी आवश्यक व्यापारी परवाने आहेत का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी यांचे नाव पुढे येत असून, त्यांच्या संरक्षणाखाली हे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांचा दावा आहे की, अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. उलट बांधकामाचा वेग वाढल्याने ‘अधिकाऱ्यांचे पाठबळ’ असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
दरम्यान, उपवन परिसर हा निवासी आणि पर्यटनदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. अशा भागात नियमबाह्य लॉज उभारल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही रहिवाशांनी तर या लॉजच्या माध्यमातून भविष्यात अवैध व्यवसायांना खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर आता या प्रकरणामुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका बाजूला सामान्य नागरिकांच्या छोट्या बांधकामांवर तातडीने हातोडा चालवला जातो, तर दुसऱ्या बाजूला हजारो स्क्वेअर फुटांचे कथित बेकायदा बांधकाम खुलेआम सुरू राहते, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे आता महापालिका आयुक्त आणि उच्चस्तरीय यंत्रणा या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.