जेलमधूनच ‘ऑपरेशन सूड’; बालाजीनगरातील फायरिंगने पुणे पुन्हा हादरले
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : शहरातील कुख्यात आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा एकदा उफाळून आला असून, बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील एका आरोपीच्या भावावर आंदेकर टोळीच्या शुटर्सकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदेकर-कोमकर संघर्षातील हा सलग चौथा रक्तरंजित हल्ला मानला जात आहे.
विशेष म्हणजे, आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सून सध्या तुरुंगात असतानाही टोळीच्या हालचाली सुरू असल्याचे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तुरुंगातूनच टोळीचे संचालन आणि प्रतिस्पर्ध्यांवर सूड उगवण्याचे आदेश दिले जात असल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वनराज आंदेकर हत्येनंतर संघर्ष तीव्र
२०२५ मध्ये गणेशपेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वनराज आंदेकरच्या बहिणीचा आणि मेहुण्याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर आंदेकर टोळीने कोमकर गटाविरोधात सूड मोहिम सुरू केल्याचे मानले जाते.
काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कात्रज-घोलेवाडी परिसरात कोमकर टोळीशी संबंधित शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. हा व्यक्तीही वनराज आंदेकर हत्याकांडातील आरोपीचा भाऊ असल्याचे सांगितले जाते. बुधवारी झालेला हल्ला हा त्याच मालिकेतील पुढचा भाग असल्याचे पोलिस मानत आहेत.
अल्पवयीन आणि तरुणांचा वापर?
आंदेकर टोळीने पूर्वीप्रमाणेच या हल्ल्यासाठी अतिशय तरुण मुलांचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. टोळींकडून बेरोजगार आणि अल्पवयीन मुलांना सहजपणे वापरले जात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तुरुंगातूनही राजकीय प्रभाव कायम
वनराज आंदेकरचे वडील बंडू आंदेकर, वनराजची पत्नी तसेच उदयकांत आंदेकर यांची पत्नी लक्ष्मी आंदेकर हे सध्या कारागृहात आहेत. मात्र, आंदेकर कुटुंबाचा राजकीय प्रभाव अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता.
दरम्यान, बालाजीनगरातील गोळीबारानंतर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुण्यातील वाढत्या गँगवॉरमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.