नवले पुलाजवळ भरदिवसा रिक्षाचालकावर कोयता हल्ला; तिघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नवले पुलाजवळ भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कात्रज चौक ते नवले पूल मार्गावरील राजमाता भुयारी मार्गाजवळील दत्तनगर चौकात सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
या हल्ल्यात सूरज माणिक काळे (वय ३०) हा गंभीर जखमी झाला. व्हिडीओमध्ये आरोपींकडून त्याच्यावर सलग वार करण्यात आल्याचे आणि त्यानंतर तो पुलाजवळ कोसळल्याचे दिसून येते. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींना अटक केली आहे. बाळासाहेब भोसले (३५), गणेश हरिभाऊ धारपाले (२७) आणि गणेश ऊर्फ भावड्या हरिभाऊ धारपाले (३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज काळे हा रिक्षाचालक असून आरोपींसोबत त्याचा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाद सुरू होता. रिक्षा प्रवासी उचलणे आणि रिक्षा स्टँडवरील वर्चस्व यावरून हा संघर्ष वाढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोमवारी सकाळी आरोपींनी सूरज काळे याला अडवून धारदार शस्त्रांनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत रोहित पवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलिसांकडून सुरू आहे.