विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; व्हीआयपी दर्शनासाठी धक्काबुक्की, भाविकांत संताप

विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; व्हीआयपी दर्शनासाठी धक्काबुक्की, भाविकांत संताप

योगेश पांडे / वार्ताहर

पंढरपूर : अधिक मासानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असताना मंगळवारी विठ्ठल मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी व्हीआयपी दर्शनासाठी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पंढरपूर दौऱ्यावेळी मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत धक्काबुक्की केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या आणि अधिक मासामुळे देशभरातून हजारो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. विठ्ठल दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या असताना राजकीय पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधांवरून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, कृष्णराज महाडिक पंढरपुरात आले असता त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिर प्रशासनाने महाडिक आणि त्यांच्यासोबत मोजक्या व्यक्तींना व्हीआयपी प्रवेशद्वारातून प्रवेश दिला. मात्र, त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनीही त्याच मार्गाने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्हीआयपी गेटवर ढकलाढकली आणि धक्काबुक्की झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

दरम्यान, रविवारपासून सुरू झालेल्या पुरुषोत्तम अर्थात अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची विक्रमी गर्दी होत आहे. पहिल्याच दिवशी चार लाखांहून अधिक भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावल्याने शहरावर ताण वाढला आहे. पुढील महिनाभर देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर गर्दी नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे.

मंगळवारी विठ्ठल दर्शनासाठी सुमारे पाच तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे भाविकांनी सांगितले. मंदिर प्रशासनाकडून दर्शन रांगांचे नियोजन करण्यात येत असले तरी व्हीआयपी दर्शनाच्या मुद्द्यावरून सर्वसामान्य भाविकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon