तब्बल ४० वर्षांपासून फरार असलेला अमली पदार्थ विक्री प्रकरणातील आरोपी जेरबंद; पायधुनी पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ विक्री प्रकरणात गेल्या तब्बल ४० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पायधुनी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मुख्तार इब्राहिम शेख (वय ६७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील इमामवाडा रोड परिसरातील बी.आय.टी. चाळ क्रमांक ५ येथे राहत होता.
या प्रकरणात १९८६ मध्ये पायधुनी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सत्र खटला क्रमांक १०५३/१९९० न्यायालयात प्रलंबित होता. मात्र आरोपी दीर्घकाळ न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने सत्र न्यायालय क्रमांक ५४ यांनी त्याच्याविरोधात कायमस्वरूपी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
पोलिसांनी आरोपीच्या जुन्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता संबंधित बीआयटी चाळ पुनर्विकासासाठी रिकामी करण्यात आल्याचे समोर आले. परिसरातील स्थानिक रहिवासी तसेच जुन्या कागदपत्रांची तपासणी करूनही आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती अथवा छायाचित्र उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आरोपीचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.
यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवला. आरोपीची बहीण शहनाझ इब्राहिम शेख हिच्याकडे तो अधूनमधून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार कनाडे यांनी संबंधित ठिकाणी गुप्त पाळत ठेवली होती. आरोपी बैतुल अमन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी परिसरात आल्याची खात्री होताच पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता संबंधित गुन्ह्यातील त्याचा सहभाग निष्पन्न झाला. तसेच न्यायालयीन सुनावणीदरम्यान तो अनुपस्थित राहिल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त रागसुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार पथकाने केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तुषार इक्के, सहाय्यक फौजदार केशव राणे तसेच पोलिस कर्मचारी कनाडे, शेडगे आणि इनामदार यांनी सहभाग घेतला.