बकरा वाहतूकदारांकडून वसुलीचा आरोप; प्लासनेर ते मुंबई मार्गावरील पोलिसांच्या भूमिकेची चौकशीची मागणी
रवि निषाद / मुंबई
मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतून मुंबईकडे बकरे घेऊन येणाऱ्या वाहनचालक आणि व्यापाऱ्यांकडून प्लासनेर सीमारेषेपासून मुंबईतील देवनारपर्यंत विविध ठिकाणी अवैध वसुली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र खटीक असोसिएशन चे अध्यक्ष हाजी अखिल ताडे यांनी संबंधित विभागांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाणे परिसर, अन्नपूर्णा हॉटेल चेकपोस्ट, शिरपूर, धुळे महामार्ग, चाळीसगाव चौक, आर्वी, झोडगे, मालेगाव महामार्ग, जळगाव फाटा, पिंपळगाव, घोटी तसेच इगतपुरी परिसरात बकरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची वारंवार तपासणी करून चालकांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः सांगवी, अन्नपूर्णा चेकपोस्ट, शिरपूर, धुळे महामार्ग आणि आर्वी-झोडगे परिसरात काही पोलीस कर्मचारी आणि कथित रोड माफिया यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हाजी अखिल ताडे यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यातील महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे बकरा व्यापारी आणि वाहनचालक त्रस्त असल्याचा आरोप करत या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना चे अध्यक्ष उदय दळवी यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
या संदर्भात संबंधित विभागांकडे लेखी निवेदने सादर करण्यात आल्याचे हाजी अखिल ताडे यांनी सांगितले.