ऑनलाइन मागवलेली तलवार बाळगणारा तरुण जालना पोलिसांच्या ताब्यात; ८,४०० रुपयांची शस्त्रे जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
जालना : शहरात बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर कदीम जालना पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून तलवार, चाकू आणि खंजीर असा एकूण ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने तलवार ऑनलाइन मागविल्याची कबुली दिल्याने ऑनलाइन माध्यमातून शस्त्र विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी शिवनगर परिसरात एक तरुण धारदार शस्त्रे घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रात्री सुमारे ९.४५ वाजता संशयिताला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या तरुणाने आपले नाव यश संतोष जाधव (वय १८ वर्षे ५ महिने, रा. शिवनगर, जुना जालना) असे सांगितले. त्याच्या झडतीत ६ हजार ४०० रुपयांची लाल म्यान असलेली धारदार तलवार, ६०० रुपयांचा लाकडी मूठ असलेला धारदार चाकू आणि २ हजार रुपयांचा काळ्या रंगाचा धारदार खंजीर असा एकूण ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने तलवार ऑनलाइन मागविल्याचे कबूल केले. त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीर शस्त्रांची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून त्या अनुषंगानेही तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.