चुलत भावाशी संबंधांच्या संशयातून तरुणीची निर्घृण हत्या; पित्याने मुलाच्या मदतीने केला मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
पोलीस महानगर नेटवर्क
बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आणि शीर धडापासून वेगळे केलेला तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, पित्यानेच स्वतःच्या मुलाच्या मदतीने मुलीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राजुरा शिवारात एका २० ते २५ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. त्यामुळे मृत तरुणीची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट पुरावे न मिळाल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक पथक, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांची मदत घेतली. परिसरातील बेपत्ता तरुणींची माहिती तपासण्यात आली. त्यानंतर मृत तरुणीची ओळख शिवानी (नाव बदललेले) अशी पटली. तपासादरम्यान शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय कुटुंबीयांना होता, अशी माहिती समोर आली.
याच कारणावरून कुटुंबात वारंवार वाद होत होते. अखेर संतापाच्या भरात पित्याने आपल्या मुलाच्या मदतीने शिवानीची हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह शिवारात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच ओळख पटू नये म्हणून शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पित्याला आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.