आंबोली नाक्यावर थरारक अपघात! चार बेस्ट बसेस धडकल्या, बस वाहकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक वीडियो समोर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंधेरी पश्चिमेतील आंबोली नाका परिसरात सार्वजनिक वाहतुकीच्या चार बसेसचा समावेश असलेला मोठा साखळी अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत ५२ वर्षीय एक बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला. आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील हा अपघात गुरुवारी दुपारी १.१५ च्या सुमारास घडला.
रस्त्यावर एक झाड पडल्यामुळे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीत अडकलेल्या तीन बसेस एका रांगेत थांबल्या होत्या. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या एका बेस्ट बसने या थांबलेल्या बसेसना जोरदार धडक दिली.मातेश्वरी’ कंपनी अंतर्गत चालणाऱ्या तीन बसेस या अपघातात अडकल्या. त्यामध्ये मार्ग क्रमांक २६६/३२ (बस क्र. ७७८३), मार्ग क्र. २४२/३२ (बस क्र. ७७७४) आणि मार्ग क्र. २४९/३३ (बस क्र. ७७७८) यांचा समावेश होता. ‘पीएमआय’ कंपनीकडून चालवली जाणारी मार्ग क्र. २५१ वरील बस (नोंदणी क्र. MH-01-FE-0620, बस क्र. ४११५) ही मागून आली आणि थांबलेल्या वाहनांना धडकली.
धडकेच्या वेळी बस क्रमांक ७७८३ वर कार्यरत असलेले वाहक शेखर बाबूराव रावते हे थांबलेल्या बसेसमागे चालत होते. अपघातात ते बस क्र. ७७७८ आणि वेगाने येणाऱ्या बस यांच्या मधोमध सापडले. त्यांना गंभीर इजा झाली. ‘पीएमआय’ बसच्या वाहकाने त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेले. मात्र,गुरुवारी दुपारी १.३५ वाजता उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मुंबई पोलिस आणि परिवहन विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, झाड पडल्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांची हालचाल मंदावली होती आणि त्याच परिस्थितीत हा अपघात घडला. अपघातस्थळी व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून, त्यात भीषण दृश्य स्पष्ट दिसत आहे.