कापूरबावडी वाहतूक पोलिसांची धाडसी कारवाई; बेळगावहून चोरीस गेलेली ‘किया सेल्टोस’ जप्त

कापूरबावडी वाहतूक पोलिसांची धाडसी कारवाई; बेळगावहून चोरीस गेलेली ‘किया सेल्टोस’ जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : कापूरबावडी वाहतूक विभागाने समयसूचकता आणि धाडस दाखवत बेळगाव येथून चोरी करून आणलेली ‘किया सेल्टोस’ कार जप्त करण्यात यश मिळवले. या कारवाईदरम्यान आरोपी चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केल्याने काही काळ घोडबंदर रोड परिसरात थरार निर्माण झाला होता.

रविवारी (१० मे) गोल्डन क्रॉस परिसरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियंत्रण कक्षाकडून कापूरबावडी वाहतूक विभागाला संशयित वाहनाबाबत माहिती प्राप्त झाली. नवी मुंबई हद्दीतून चोरीची KIA Seltos (केए २२ एमसी ८१२२) ठाणे शहराच्या दिशेने येत असल्याचा संदेश पोलिसांना मिळाला होता.

पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अश्रू हाके, पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या पथकाने माजिवडा जंक्शन येथील गोल्डन क्रॉस परिसरात संबंधित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत भरधाव वेगाने घोडबंदर रोडच्या दिशेने पलायन केले.

यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत एका डिलिव्हरी बॉयची पल्सर दुचाकी घेऊन आरोपीचा पाठलाग सुरू केला. मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ मार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत तब्बल सात ते आठ किलोमीटर हा थरारक पाठलाग सुरू होता. आरोपीने पाठलागादरम्यान इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अखेर विजय गार्डन सिग्नलजवळ पोलिसांनी संबंधित कार अडवण्यात यश मिळवले. मात्र चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी आरोपीचा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पायी पाठलाग केला. आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला; मात्र अंधार आणि परिसरातील आडोशाचा फायदा घेत आरोपी पसार झाला.

दरम्यान, जप्त करण्यात आलेली चोरीची कार कापूरबावडी वाहतूक विभागात आणण्यात आली. त्यानंतर वाहनमालक राहुल जाधव तसेच बेळगाव पोलिसांनी ठाण्यात येऊन वाहनाची ओळख पटवली. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon