मुरबाड बस स्थानकात एसटी बस चालकाकडून प्रवाशाला मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चालकावर निलंबनाची कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – एसटी म्हटली की सर्व सामान्यांचे हक्काचे वाहन. त्यामुळे आज ही एसटीने प्रवास करण्याला सर्वच जण पसंती देतात. पण अनेक वेळा एसटी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे महामंडळाची प्रतिमाच खराब होत आहे. अशीच एक घटना मुरबाड बस स्थानकात घडल्याचे समोर आले आहे. कल्याणला जाणारी बस कधी सुटेल, असा साधा प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण दुसरा तिसरा कोणी नसून बस चालकानेच केली आहे. तिथे असलेल्या अन्य प्रवाशांनी या मारहाणीचा व्हिडीओ शूट केला. नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे एसटी प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पावले उचलत संबंधित बस चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
एक तरुण प्रवासी मुरबाड बस स्थानकात आला होता. त्याला कल्याणला जायचे होते. बसच्या वेळेबाबत खात्री करण्यासाठी तो स्थानक नियंत्रकाच्या कॅबिनमध्ये गेला. तिथे बसबाबत विचारणा करताना नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याशी त्याचा किरकोळ शाब्दिक वाद झाला. हा वाद सुरू असतानाच तेथे उपस्थित असलेल्या दत्ता भालेराव या बस चालकाने अचानक मध्यस्थी केली. त्यामुला सोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर चालक दत्ता यांनी संबंधित तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
बस स्थानकातील हा प्रकार पाहून इतर प्रवासी अवाक झाले. काही प्रवाशांनी या मारहाणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. प्रवाशांना सौजन्याची वागणूक देण्याऐवजी अशा प्रकारे मारहाण केली जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. घटनेचे गांभीर्य ओळखून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यामुळे बस चालक दत्ता भालेराव यांना तत्काळ सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारी सेवेत असताना प्रवाशांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे धडे एसटी प्रशासनाकडून वारंवार दिले जातात, मात्र मुरबाडमध्ये याउलट चित्र पाहायला मिळाले. एका तरुणाला झालेल्या मारहाणीचे पडसाद उमटताच प्रशासनाने चालक दत्ता भालेराव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ही घटना प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली असून, सोशल मीडियाच्या दबावामुळे का होईना, पण महामंडळाला कठोर पाऊल उचलावे लागले आहे.