वर्सोव्यात ४ कोटींचे हेरॉईन जप्त; उत्तराखंडातील दोघांना अटक
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : अँटी नार्कोटिक्स सेलच्या (एएनसी) कांदिवली युनिटने अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा परिसरात मोठी कारवाई करत ४ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी उत्तराखंडमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ड्रग्ज रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यारी रोड परिसरात संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर एएनसीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या वेळी आरोपींकडून ७६५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरमान अयुब मलिक (वय ३२, रा. देहरादून, उत्तराखंड) आणि दानिश भूरा अली (वय २३, रा. हरिद्वार, उत्तराखंड) अशी आहेत. दोघांनाही १० मे २०२६ रोजी पहाटे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२६ अंतर्गत अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ मधील कलम ८(क), २१(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ड्रग्ज नेटवर्कमागील इतर आरोपी आणि पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, डीसीपी नवनाथ ढवळे आणि एसीपी हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएनसी कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.