बीड नगरपालिकेत राडा!

बीड नगरपालिकेत राडा!

मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यालाच केबिनमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न झाला आहे. बीड नगरपालिकेत हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना त्यांच्या दालनात शिरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पीटीआर वर नाव नोंदणी करण्याच्या कारणावरून हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या कृत्याचा निषेध करत आणि संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

मुख्याधिकारी शैलेश फडसे हे आपल्या दालनात कार्यालयीन कामकाज करत होते. त्यावेळी एक व्यक्ती तिथे आली. या व्यक्तीने पीटीआरची नोंदणी करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. चर्चा सुरू असतानाच या व्यक्तीने अचानक अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली. शिवाय थेट जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही कर्मचारी त्यावेळी पुढे सरसावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्या व्यक्तीला कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी अटकाव केला.

आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकी दिल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दोषी व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्याधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून तक्रार दाखल होताच कठोर कारवाई केली जाईल. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सरकारी कार्यालयात ही कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीड सध्या वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे. त्यात आता मुख्याधिकाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकीने बीड पुन्हा चर्चेत आले आहे. पीटीआर नोंदणीच्या तांत्रिक प्रक्रियेवरून एका व्यक्तीने थेट मुख्याधिकाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना धमकावले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून, कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासकीय कामात राजकीय किंवा वैयक्तिक हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याचे हे प्रकार निंदनीय असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात फिर्याद घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon