एसीबी कारवाईतील ‘चावा प्रकरणा’नंतर पुण्यातील हवालदार निलंबित
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकावर झडप घालत तक्रारदाराच्या छातीचा चावा घेऊन पळण्याचा प्रयत्न करणारा हवालदार गणेश शहाजी कस्पटे याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी गुरुवारी निलंबनाचे आदेश जारी केले.
कस्पटे हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात समन्स आणि वॉरंट बजावण्याचे काम पाहत होता. एका जुन्या प्रकरणात मदत करण्यासाठी त्याने यापूर्वी पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप असून, पुन्हा दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले होते.
या प्रकरणात कस्पटे याच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे वर्तन आणि कर्तव्यातील निष्काळजीपणामुळे त्याच्याविरोधात स्वतंत्र विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.