लातूरमध्ये १.१८ कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश; ७१४ किलो गांजा जाळला
पोलीस महानगर नेटवर्क
लातूर : जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल १ कोटी १८ लाख २७ हजार रुपयांच्या अंमली पदार्थांचा कायदेशीर प्रक्रियेनंतर नाश केला. यामध्ये सुमारे ७१३.९२ किलो गांजा, २१.२०० किलो अफू आणि ९६ ग्रॅम एमडी ड्रग्जचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या उपस्थितीत एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील किर्ती ऑईल मिल येथे न्यायालयीन आदेशानुसार पंचनामा करून सर्व मुद्देमाल फायर बॉयलरमध्ये टाकून जाळण्यात आला.
या वेळी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, प्रभारी उपअधीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक समाधान चवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान प्रदूषण होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.