पालघर अत्याचार प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ. नीलम गोरे 

पालघर अत्याचार प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ. नीलम गोरे 

पालघर / नवीन पाटील

 पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाणे हद्दीतील 13 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण गंभीर असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी आज पीडिता व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना जामीन मिळू नये तसेच न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पार पडावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पीडित मुलीचे शिक्षण खंडित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे गोरे यांनी सांगितले.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तपासात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर प्रकरण लैंगिक अत्याचाराशी संबंधित असल्याने ते “नॉन-कंपाउंडेबल” असून कोणत्याही तडजोडीतून मागे घेता येणार नाही. डीएनए तपासणीसारख्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा होण्याची शक्यता अधिक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्य सरकार या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

माध्यमांनीही जबाबदारीने वागावे, पीडितेची ओळख उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संवेदनशील माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन गोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon