बाप-लेकीच्या नात्याला काळीमा!
दारूच्या नशेत बापानेच स्वत: च्या ९ वर्षीय मुलीला संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवला
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगावराजे परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. देऊळगावराजे येथील हडगळेवस्तीमध्ये वडिलांनी आपल्या ९ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम चव्हाण (३३) याने दारूच्या नशेत आपल्या मुलीवर झाड तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटर मशीनने गळ्यावर आणि हातावर वार करत तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून पेटवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत मुलगी ही आरोपीच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. तिचा १० वर्षीय भावासह नुकताच शाळेचा निकाल लागला होता. निकालातील क्रमांकात फेरफार झाल्याच्या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात हे अमानुष कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही घटना बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.