कल्याण लोहमार्ग पोलीसांची उत्तम कामगिरी; रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.अक्षय ढेकळे,शहबाज खान,अशोक मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .कल्याण रेल्वे स्थानकात फिरत असताना कल्याण रेल्वे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी याआधी किती मोबाईल चोरले आहेत.मोबाईल चोरी करून हे कोणाला विकतात?याचा तपास आता कल्याण रेल्वे पोलिसांनी सुरू केला आहे.
कल्याण रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने या रेल्वे स्थानकातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर व भिवंडी या ठिकाणाहून लोक कल्याण जंक्शनला येतात.लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी प्रवासी रेल्वे स्थानकात येऊन थांबतात.रेल्वे स्थानकात प्रवासी झोपले असता चोरटे या संधीचा फायदा घेतात.झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल आणि इतर वस्तू चोरून पसार होतात.अशा प्रकारच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
कल्याण आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात अनेक चोरट्यांना अटक केली आहे. मात्र हे सर्व प्रकार अजूनही सुरू असल्याची माहिती आहे.कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकात फिरत असताना वेगवेगळ्या घटनेत तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. या तरुणांची जेव्हा विचारपूस करण्यात आली, तेव्हा त्यांनी पोलिसांना कोणतंही उत्तर दिलं नाही.
पोलिसांना या तिघांवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांची तपासणी केली.त्यावेळी त्यांच्याकडे चोरलेले मोबाईल आणि काही वस्तू सापडल्या. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. आरोपींनी यापूर्वी देखील चोरी केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मोबाईल चोरी करून हे कोणाला विकतात? पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. एप्रिल आणि मे मध्ये प्रवासाची संख्या जास्त असते. त्यामुळे असे प्रकार अनेकदा घडतात.